महाकेअरच्या माध्यमातून कर्करोग उपचारांना नवी दिशा; विदर्भासह मध्य भारतातील रुग्णांना अत्याधुनिक निदान व उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाकेअर (महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन) संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत राज्यातील कर्करोग उपचार व्यवस्थेला बळकटी देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये नागपूर येथे ‘हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट’ या उपकंपनीच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली असून, त्यामुळे अत्याधुनिक कर्करोग निदान आणि उपचार सुविधा राज्यात अधिक सक्षम होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक कर्करुग्णाला जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त करत महाकेअरच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उभारण्यावर भर दिला. राज्यभर एल-२ आणि एल-३ स्तरावरील कर्करोग रुग्णालयांचे जाळे उभारून उपचार अधिक सुलभ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत महाकेअरसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून १०० कोटी रुपयांच्या कॉर्पस निधीला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. तसेच संस्थेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, सीएसआर निधी स्वीकारणे आणि आवश्यक प्रशासकीय नियुक्त्यांनाही मंजुरी देण्यात आली.
महाकेअरच्या आराखड्यानुसार नागपूरसह मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, नाशिक आणि अमरावती येथे सर्वसमावेशक कर्करोग उपचार केंद्रे उभारली जाणार आहेत. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे नागपूर कर्करोग निदान, संशोधन आणि अत्याधुनिक उपचारांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
















Leave a Reply