कर्जत पंप स्टोरेज प्रकल्पावरून राज्यात पर्यावरण आणि विकासाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार असल्याचा आरोप करत विरोध केला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून त्याबाबत जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा दावा देवाभाऊंनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून 16 किलोमीटर आणि भीमाशंकर मंदिरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. प्रकल्पासाठी 233 हेक्टर जमीन आवश्यक असून कंपनीने वृक्षारोपणासाठी 253 हेक्टर जमीन वन विभागाला उपलब्ध करून दिल्याचं सरकारचं म्हणणं आहे. या जमिनीवर वन विभागाच्या माध्यमातून एकूण 90 हजार झाडं लावण्याची योजना असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
या प्रकल्पातून महाराष्ट्राला 12 हजार मेगावॅट वीज उपलब्ध होण्याची अपेक्षा असून, सुमारे 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. हा प्रकल्प गुजरातचा नसून महाराष्ट्राच्या हिताचा आहे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांवर निशाणा साधला. प्रकल्पातून मिळणारी ऊर्जा, गुंतवणूक आणि रोजगाराचा लाभ महाराष्ट्रालाच होणार असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
दरम्यान, प्रकल्पाला कायदेशीर प्रक्रिया आणि संबंधित प्राधिकरणांच्या परवानग्यांनंतर मंजुरी मिळाल्याचं सरकारचं म्हणणं आहे. मात्र, स्थानिकांच्या काही हरकती असतील तर त्या ऐकून घेऊन योग्य मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे एकीकडे विकास आणि ऊर्जा निर्मितीचा मुद्दा, तर दुसरीकडे पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांच्या चिंता, या दोन्ही बाबींवर पुढील काळात काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागलं आहे.












Leave a Reply