मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवरून काँग्रेस आणि इंडिया आघाडीने केंद्र सरकार तसेच निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. SIR प्रक्रिया रद्द करण्यासह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या राजकीय संघर्षात आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओच्या माध्यमातून काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय कायदेमंत्री कपिल सिब्बल यांचा संसदेतील भाषणाचा व्हिडिओ ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या आधारे त्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या विरोधाची तुलना पक्षाच्या पूर्वीच्या भूमिकेशी केली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? – फडणवीस यांनी आपल्या पोस्टला ‘काँग्रेसची डबल ढोलकी!’ असे शीर्षक दिले आहे. काँग्रेसकडून विविध व्यासपीठांवर SIR प्रक्रियेविरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, त्याआधी काँग्रेसच्या सत्ताकाळातील तत्कालीन कायदेमंत्री कपिल सिब्बल यांचे संसदेतील अधिकृत नोंदींमधील वक्तव्यही ऐकावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
सिब्बल यांनी त्यावेळी SIR प्रक्रियेच्या समर्थनार्थ भूमिका मांडल्याचा दावा फडणवीस यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. काँग्रेसच्या राजकीय भूमिकेत बदल झाला असला, तरी संसदेतील नोंदी बदलत नाहीत, असा टोला लगावत त्यांनी जनतेला दोन्ही बाजू ऐकून निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.
SIR वरून दिल्लीतील राजकीय संघर्ष तीव्र – SIR प्रक्रियेच्या अंमलबजावणीवरून सध्या दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. मतदार याद्यांमधील कथित अनियमितता आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आंदोलने आणि मोर्चांच्या माध्यमातून विरोध नोंदवला जात आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या पूर्वीच्या संसदीय भूमिकेचा संदर्भ देत सध्याच्या विरोधावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे SIR च्या मुद्द्यावर केवळ निवडणूक प्रक्रियेपुरताच नव्हे, तर राजकीय पक्षांच्या भूमिकेतील सातत्यावरूनही वाद रंगण्याची चिन्हे आहेत.












Leave a Reply