पुणे : चाकण आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी, पावसाळी पाणी निचरा आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. चाकणसाठी ₹1,400 कोटी, तर हिंजवडीसाठी ₹426 कोटींच्या आराखड्याला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली.
चाकणमध्ये पहिल्या टप्प्यात 75 किलोमीटर रस्त्यांची सुधारणा, सुमारे 38 किलोमीटर पावसाळी गटार व्यवस्था आणि 78 किलोमीटर नैसर्गिक नाल्यांवरील अडथळे दूर करण्याचे नियोजन आहे. नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून जून 2027 पर्यंत पाणी निचऱ्याची व्यवस्था पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
वाहतूक सुधारण्यासाठी 500 अतिरिक्त बस, सहा प्रमुख चौकांची पुनर्रचना तसेच AI आधारित सिग्नल, CCTV, रडार आणि वाहन क्रमांक ओळख प्रणाली उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विविध विभागांनी समन्वयाने ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, चाकणमध्ये 100 MVA वीज उपकेंद्राचे काम डिसेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. हिंजवडीतील वीजपुरवठ्यासाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ही कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.












Leave a Reply