ड्रग्ज माफियांना फडणवीसांचा इशारा! सलीम डोला भारतात, मोठा साठा जप्त ‘वारंवार ड्रग्ज सापडले तर अधिकाऱ्यांवर कारवाई’

राज्यातील ड्रग्ज माफियांविरोधात सरकारने आक्रमक भूमिका घेतली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी माहिती दिली आहे.

परदेशात लपून बसलेला आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर सलीम डोला याला भारतात आणण्यात आलं असून, त्याने देशभरात पसरवलेल्या हजारो किलो एमडी ड्रग्जपैकी मोठा साठा जप्त करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.राज्यात अमली पदार्थांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू असून, केवळ ड्रग्ज विक्रेत्यांवरच नव्हे, तर त्यामागील संपूर्ण रॅकेट उध्वस्त करण्यावर भर दिला जात असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी विशेष पथक स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष लाभ आणि पसंतीच्या ठिकाणी पुढील नियुक्ती देण्यात येईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. अमली पदार्थांबाबत माहिती देणाऱ्यांना पारितोषिक देण्याचाही सरकारचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं.

याचबरोबर, ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार ड्रग्ज सापडतील, त्या ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. ड्रग्ज माफियांविरोधातील लढाई आणखी तीव्र करण्याचा निर्धार सरकारने केल्याचं या विधानातून स्पष्ट झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *