बालगुन्हेगारीवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; अल्पवयीनांचा वापर करणाऱ्यांवर मकोका, कायद्यात होणार बदल

राज्यात वाढत्या बालगुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वाची घोषणा करत, अल्पवयीन मुलांचा वापर करून गंभीर गुन्हे घडवून आणणाऱ्यांवर आता मकोकांतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. संघटित गुन्हेगारीमध्ये बालकांचा वाढता वापर रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जालना जिल्ह्यातील खुनाच्या १७ प्रकरणांमध्ये आठ अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळल्याचा मुद्दा शिंदेसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत उपस्थित केला. कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा घेत गुन्हेगारी टोळ्या बालकांना पुढे करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी शाळकरी मुलाच्या दप्तरात रामपुरी चाकू सापडल्याची घटना सांगत, बालकांमधील वाढत्या हिंसक प्रवृत्तीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, बालकांना गुन्ह्यांसाठी प्रवृत्त करणाऱ्या किंवा त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींवर मकोका लागू करता यावा, यासाठी आवश्यक कायदेबदल केले जातील. तसेच बालकाची व्याख्या १८ वर्षांवरून १६ वर्षांपर्यंत मर्यादित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याशिवाय, १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये गंभीर गुन्ह्यांची प्रवृत्ती का वाढत आहे, याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाय सुचवण्यासाठी राज्य सरकार उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बालगुन्हेगारीवर कठोर कारवाईसोबतच सामाजिक आणि मानसिक कारणांचा अभ्यास करून दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यावर सरकारचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *