राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी वीज जोडण्यांवरील सुमारे 48 हजार कोटी रुपयांची थकीत वीजबिले माफ करण्याची घोषणा त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केली. या निर्णयामुळे जुन्या थकबाकीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याच कोऱ्या पाटीवर नव्या इतिहासाची सुरुवात झाली पाहिजे.” राज्यातील 76 टक्के शेतकऱ्यांना सध्या दिवसा वीज मिळत असून, वर्षाअखेरीस हे प्रमाण 100 टक्क्यांपर्यंत नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार, शेततळे, ठिबक सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नसल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीत गुंतवणूक, नैसर्गिक शेती, उत्पादकता वाढ आणि जागतिक बाजारपेठेशी जोडणी यावर भर दिला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि सामूहिक गुंतवणूक मॉडेलची आवश्यकता असल्याचे सांगत, सरकार शेती क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडवण्याच्या दिशेने काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.











Leave a Reply