महापुराच्या पाण्याला मिळणार नवा मार्ग! ४० टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना दरवर्षी बसणाऱ्या महापुराच्या तडाख्याला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. महापुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागांकडे वळवण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली असून, सुमारे ३५ ते ४० टीएमसी पाणी कालव्याच्या माध्यमातून उजनी धरणापर्यंत नेले जाणार आहे. त्यानंतर हे पाणी मराठवाड्यासह दुष्काळी तालुक्यांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कोल्हापुरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र रेझिलिअन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामचा उल्लेख करत या प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट केले. कोल्हापूर-सांगली परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी जमा होते. त्यातील पाण्याचा नियोजनबद्ध वापर केल्यास एकीकडे पूरस्थितीची तीव्रता कमी होईल, तर दुसरीकडे दुष्काळी भागांना मोठा जलसाठा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली असून, आधुनिक स्टेडियमसाठी बीसीसीआयकडे राज्य सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. फुटबॉलसाठीही आवश्यक क्रीडा सुविधांना चालना देण्याचे संकेत त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *