मुंबई : मतदार यादीतील विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात SIR प्रक्रियेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी SIR तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत महाजनमोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.
ठाकरे बंधूंच्या प्रस्तावित मोर्चाबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ‘राजकीय स्टंट’ असल्याचं म्हटलं. या माध्यमातून जनतेमध्ये अविश्वास आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या मोर्चाची घोषणा केली. SIRच्या प्रक्रियेतून मतदारांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत मनसे आणि उद्धवसेना संयुक्तपणे हा जनमोर्चा काढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा केवळ दोन पक्षांचा मोर्चा न राहता सर्व राजकीय पक्ष आणि जनतेचा आवाज बनावा, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.
याच मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. लोकांचा विश्वास संपादन करण्यात अपयश आल्यानंतर समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा मार्ग अवलंबला जात असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. “जेव्हा लोकांना पटवून देता येत नाही, तेव्हा त्यांना गोंधळात टाका,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. संविधानिक संस्थांबाबत जनतेच्या मनात अविश्वास निर्माण करण्याची ही पद्धत असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं.
राहुल गांधींवरही फडणवीसांचा निशाणा – दरम्यान, पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. राहुल गांधींची राजकीय विचारसरणी डाव्या आणि साम्यवादी दिशेने जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. संविधान आणि घटनात्मक संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. काँग्रेसच्या भूमिकेमुळे देशातील संस्थांविषयी अविश्वासाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही फडणवीस म्हणाले.












Leave a Reply