दिवेआगर दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; 8 विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश

रायगड : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले आहेत. मृत विद्यार्थ्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आळंदी येथे पोहोचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून समन्वय साधला जात आहे.

गुरुवारी सायंकाळी दिवेआगर समुद्रकिनारी ही दुर्दैवी घटना घडली. विनर्स अकॅडमीचे विद्यार्थी पर्यटनासाठी आले असताना समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आळंदी परिसरातही शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच मंत्री आदिती तटकरे यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, दिवेआगर येथे पर्यटनासाठी आलेल्या विनर्स अकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. मृत विद्यार्थ्यांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

विद्यार्थ्यांचे पार्थिव आळंदीला पोहोचवण्यासाठी समन्वय – मृत विद्यार्थी आळंदी येथील असल्याने त्यांचे पार्थिव मूळ गावी नेण्यासाठी स्थानिक प्रशासन समन्वयाने काम करत आहे. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही केली जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या. दिवेआगर समुद्रकिनारी घडलेल्या या दुर्घटनेने पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोक व्यक्त केला जात असून, या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *