2027 मेट्रो वर्ष! 70 किमी मेट्रो मार्गिका पूर्ण करण्याचे लक्ष्य, मुख्यमंत्र्यांचा Metro Masterplan!

मुंबई : महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला वेग देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पांसाठी मोठं लक्ष्य निश्चित केलं आहे. 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ म्हणून राबवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून, पुढील वर्षात किमान 70 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा ‘मुख्यमंत्री कार्यालय वॉर रूम’च्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. या बैठकीत मेट्रोसह मुंबई आणि राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा झाली.

डिसेंबर 2026 पर्यंत 36 किलोमीटर मेट्रो मार्गिका पूर्ण होण्याचा अंदाज आहे. मात्र, या कामाची व्याप्ती वाढवून 50 किलोमीटरपर्यंत मेट्रो मार्गिका पूर्ण करण्यासाठी वेगाने काम करण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर 2027 मध्ये आणखी किमान 70 किलोमीटर मेट्रो मार्गिका पूर्ण करण्याचा फडणवीस सरकारचा प्रयत्न असेल.

प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी केवळ मनुष्यबळावर अवलंबून न राहता किमान 50 टक्के काम यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून करण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. कुशल कामगारांची उपलब्धता वाढवतानाच मजुरांची कमतरता भासल्यास यंत्रसामग्रीच्या माध्यमातून त्यावर मात करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. मेट्रो मार्गिका 2-ब संदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. डी. एन. नगर ते चेंबूर मार्गावरील जुहू सर्कल परिसरातील गर्डरचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार रविवारी 12 तासांचा विशेष रस्ता ब्लॉक घेण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, शिवडी-वरळी उन्नत मार्गिकेची जोडणी 31 मे 2027 पूर्वी पूर्ण करून हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईतील विकासकामांना आणखी गती मिळावी यासाठी भूमिगत नागरी सुविधांचे अद्ययावत मॅपिंग करण्यावरही फडणवीसांनी भर दिला. एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी ही माहिती एका सुलभ यंत्रणेत उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून भविष्यातील रस्ते, मेट्रो आणि इतर पायाभूत प्रकल्पांमध्ये वारंवार होणारे अडथळे कमी होतील, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली.

याच बैठकीत छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेचाही आढावा घेण्यात आला. शहरातील प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी पोहोचेल, याची खात्री करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच नळजोडणीसाठी भविष्यात पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येऊ नये, यासाठी सुरुवातीपासूनच योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. एकूणच, मेट्रो प्रकल्प, उन्नत मार्गिका, यांत्रिकीकरण आणि भूमिगत सुविधांचे मॅपिंग अशा अनेक आघाड्यांवर कामाला वेग देत 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *