‘डरपोक आणि भाडोत्री लोकांना सोडणार नाही!’ टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा इशारा; पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मुंबईतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, हल्लेखोरांसह त्यांच्यामागे असलेल्या सूत्रधारांनाही शोधून काढले जाईल, असा ठाम इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. पोलिसांना तपासादरम्यान महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून, या प्रकरणातील कोणालाही सोडले जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच टायगर श्रॉफ वर हल्ला करणाऱ्या तिघांना जयपुर रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे. त्यांना लवकरच मुंबई पोलिसांच्या हवाले करण्यात येणार आहे.

मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर 18 ऑक्टोबरच्या रात्री ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुरक्षित असला, तरी त्याचा कारचालक फिरदोस आणि एका रिक्षाचालकाला दुखापत झाली. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी टायगर श्रॉफने स्वतः गाडी चालवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘हल्लेखोरच नव्हे, तर त्यांच्यामागचे सूत्रधारही शोधणार’ – या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत विश्वास व्यक्त केला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याबरोबरच त्यांना निर्देश देणाऱ्या व्यक्तींचाही शोध घेतला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना सरकार कोणत्याही परिस्थितीत थारा देणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. प्रत्येक धमकी गांभीर्याने घेतली जाते आणि त्यानुसार कारवाई केली जाते. त्यामुळे या प्रकरणातही तपासाच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

टायगर श्रॉफशी मुख्यमंत्र्यांचे बोलणे; सुरक्षेची दिली ग्वाही – या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायगर श्रॉफशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याची माहिती दिली. त्याला काळजी न करण्याचे आश्वासन दिले असून, या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना शोधून काढले जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई पोलीस व्यावसायिक पद्धतीने तपास करणारे दल असून, यापूर्वीही अशा प्रकरणांमध्ये आरोपी आणि त्यांच्यामागील सूत्रधारांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे या प्रकरणाचाही पर्दाफाश केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र पोलिसांकडून गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची तयारी – या हल्ल्यामागील संपूर्ण यंत्रणेचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्याबाहेर किंवा देशाबाहेर राहून गुन्हेगारी कारवाया चालवणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी समन्वयाने तपास केला जाईल. केवळ प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या आरोपींना पकडणे हा या तपासाचा उद्देश नसून, अशा घटनांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणाऱ्या आणि त्यांचे नियोजन करणाऱ्या व्यक्तींचे नेटवर्कही उद्ध्वस्त केले जाईल, असा ठाम संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *