मुख्यमंत्री फडणवीसांची दखल; अनधिकृत बांधकाम प्रकरणात चंद्रपूर मनपा आयुक्तांच्या भूमिकेची चौकशी

चंद्रपूर : भानापेठ येथील काँग्रेस नगरसेवक राहुल चौधरी यांच्या कथित अनधिकृत बांधकाम प्रकरणात चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच उपमुख्यमंत्र्यांनीही नगरविकास विभागाला दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने मनपा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूरचे रहिवासी पंकज किशोर चौधरी यांनी मंत्रालयात सादर केलेल्या तक्रारीत नगरसेवक राहुल चौधरी यांनी बनावट प्रतिज्ञापत्राच्या आधारे आणि महापालिकेची परवानगी न घेता बांधकाम उभारल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. शिवाय न्यायालयाचा स्थगिती आदेश आणि मनपाकडून बजावण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस असतानाही बांधकाम सुरूच राहिल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

या संपूर्ण प्रकरणात मनपा प्रशासनाने कोणतीही प्रभावी कारवाई न करता संबंधित बांधकामाला अभय दिल्याचा आरोप करण्यात आला असून, आयुक्तांनी कर्तव्यात कसूर केल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तत्काळ चौकशी’ करण्याचे निर्देश दिल्यानंतर आता आयुक्तांच्या भूमिकेची अधिकृत तपासणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीही तक्रार अर्जातून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *