फडणवीसांची मोठी घोषणा!मुंबईच्या लोकल प्रवासाला मिळणार एसीची नवी थंडगार साथ; 238 नव्या लोकलसाठी वेगाने काम

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या लोकल रेल्वेला आता आधुनिकतेची नवी जोड मिळणार आहे. 2029 पर्यंत मुंबईतील लोकल ट्रेनचा ताफा मेट्रोच्या धर्तीवर अधिक आधुनिक आणि वातानुकूलित करण्याचे लक्ष्य असून, त्यासाठी तब्बल 238 नव्या एसी लोकल उपलब्ध होणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची माहिती दिली. लोकल ट्रेनच्या आधुनिकीकरणाच्या कामाला अपेक्षित वेग मिळत नसल्याने 2030 पूर्वी नव्या गाड्या उपलब्ध होण्याची शक्यता कमी होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत केलेल्या चर्चेनंतर या प्रक्रियेला वेग देण्यात आला.

केंद्राच्या तीन कोच निर्मिती कारखान्यांमध्ये नव्या लोकलच्या निर्मितीला गती देण्यात आली आहे. त्यामुळे आता 2027 पासूनच पहिल्या एसी लोकल मुंबईच्या सेवेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने नव्या गाड्या ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन आहे. या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एसी सुविधा मिळणार असली तरी सेकंड क्लासच्या भाड्यात वाढ केली जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे आधुनिक सुविधांसोबतच सामान्य मुंबईकरांच्या खिशाचा विचारही करण्यात आला आहे.

2027 पासून एसी लोकलची सुरुवात आणि 2029 पर्यंत आधुनिक लोकलचा मोठा ताफा उभारण्याचे लक्ष्य, यामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात हा महत्त्वाचा बदल ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले असून, मुंबईच्या ‘लाइफलाइन’ला आधुनिक बनवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *