मुंबई : मराठी चित्रपटांना अधिकाधिक व्यासपीठ आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचं पाऊल उचलण्यात येणार आहे. मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र चित्रपटगृह उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून, लवकरच त्याबाबत घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मराठी चित्रपटांची आशयप्रधानता, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही त्यांची मोठी ताकद असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. मराठी चित्रपटांसाठी अधिक स्क्रीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सरकारने आराखडा तयार केला आहे. स्वतंत्र चित्रपटगृहांच्या माध्यमातून मराठी चित्रपटांना हक्काचं प्रदर्शन व्यासपीठ मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
याचबरोबर चित्रपट निर्मितीच्या पायाभूत सुविधांमध्येही वाढ करण्यावर सरकारचा भर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज चित्रनगरी विकसित करण्याची योजना असून, चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध प्रकारचे सेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या समृद्ध परंपरेचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी कलावंतांनी निर्माण केलेल्या दर्जेदार परंपरेचा विशेष उल्लेख केला. मराठी चित्रपटसृष्टीला आधुनिक सुविधा आणि व्यापक व्यासपीठ मिळाल्यास तिच्या पुढील वाटचालीला अधिक बळ मिळेल, अशी सरकारची भूमिका या घोषणेतून स्पष्ट झाली आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पं. हृदयनाथ मंगेशकर, प्रसाद ओक, सलीम खान आणि राणी मुखर्जी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.












Leave a Reply