दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत, केंद्राच्या निधीची वाट न पाहता राज्य सरकारचा निर्णय

अमरावती : दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्याच्या निधीतून मदत देण्याचा आदेश शुक्रवार, 25 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुष्काळ संहितेतील ‘ट्रिगर एक’नुसार ही मदत दिली जाणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूर, धाराशिव, सोलापूरनंतर वाशिममधील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर अमरावती विमानतळावर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. केंद्राकडून मदतीसाठी आवश्यक पंचनामे आणि प्रस्तावाची प्रक्रिया सुरू राहणार असून, तोपर्यंत राज्य स्वतःच्या निधीतून मदत करणार आहे.

दरम्यान, दुष्काळात रोजगारासाठी तलावांमधील गाळ काढणे, जलसंधारणाची कामे आणि तलाव दुरुस्तीला गती दिली जाणार आहे. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नियमांनुसार नवीन पीककर्ज देण्याचे निर्देशही बँकांना देण्यात आले आहेत. तसेच हमीभावाने शेतमाल खरेदीसाठी लवकरच नोंदणी सुरू केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *