ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील आगामी ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2026 पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊस उपलब्धता, गाळप नियोजन, साखर उत्पादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा ऊसदर यांचा सविस्तर आढावा घेतला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 2025-26 गाळप हंगामाचा आढावा, एफआरपी व आरआरसीची थकबाकी, साखर साठा, इथेनॉल पुरवठा, सहवीज निर्मिती, ऊस क्षेत्र व उत्पादन यांसह 2026-27 हंगामाच्या पूर्वतयारीवर चर्चा झाली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पादकता वाढवण्यासाठी विशेष ऊस विकास योजना राबविण्याबाबतही सादरीकरण करण्यात आले. सुधारित ऊस वाण, रोपवाटिका, ठिबक सिंचन, संतुलित खतवापर, आधुनिक लागवड पद्धती आणि यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येणार आहे.

दरम्यान, साखरेच्या किमान विक्री किमतीत (MSP) वाढ, इथेनॉलच्या दरात वाढ आणि प्रलंबित व्याज अनुदानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाकडे शिफारस करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. शेतकरी आणि साखर उद्योगाचा समतोल साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *