मुंबई : भारतीय लोकशाहीची खरी ताकद संविधानात असून, देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा ठाम इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच भारताची लोकशाही आजही भक्कमपणे उभी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील दादर येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तकांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले.
भारतामध्ये सत्ताबदल निवडणुकांच्या माध्यमातूनच होतो आणि देशातील महत्त्वाचे निर्णय संविधानिक चौकटीत घेतले जातात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. न्यायासाठी संविधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही संविधानातील मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे आवश्यक असल्याचे सांगत, संविधानाचा आदर आणि इतरांच्या अधिकारांचा सन्मान हीच सक्षम लोकशाहीची पायाभरणी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.












Leave a Reply