छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील विविध प्रश्न आणि समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची हाक दिली असून, या आंदोलनाला ‘तुमसे ना हो पायेगा’ असं नाव देण्यात आलं आहे. या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मराठवाड्यात आले होते. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील पावसाची स्थिती, शेतीचं नुकसान आणि दुष्काळाच्या संभाव्य परिस्थितीबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.
पावसाचा मोठा खंड पडल्याने मराठवाड्यासह काही भागांतील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. अधिकृत पंचनामे एनडीआरएफच्या निकषांनुसार 5 ऑक्टोबरनंतर ग्राह्य धरले जाणार असले, तरी त्यासाठी सरकार थांबणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नुकसानग्रस्त भागांमध्ये तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, परिस्थितीनुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबवल्या जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्यांना थेट मदत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासह आवश्यक उपाययोजनांसाठी राज्य सरकारने तयारी केली असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.
‘हे नाकार्त्यांचं आंदोलन’ – दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलनाबाबत विचारलं असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. “हे नाकार्त्यांचं आंदोलन आहे. ज्यांना संधी मिळाली, पण त्यांनी काही केलं नाही, अशांचं हे आंदोलन आहे,” अशी टीका त्यांनी केली. “आम्ही यापूर्वीही करून दाखवलं आहे आणि पुढेही करून दाखवू. मराठवाड्याला दिलेला शब्द पूर्ण करू,” असं म्हणत फडणवीस यांनी आपल्या सरकारच्या कामांचा दाखला दिला.
‘फ्लड मिटिगेशनचं पाणी आणण्याचं काम करून दाखवलं’ – मराठवाड्यासाठी फ्लड मिटिगेशनच्या माध्यमातून पाणी आणण्याचा मुद्दा उपस्थित करताना फडणवीस म्हणाले की, याबाबत बोललो तेव्हा आपली खिल्ली उडवण्यात आली. मात्र, त्यानंतर या प्रकल्पाचं टेंडर काढण्यात आलं, वर्ल्ड बँकेची मान्यता मिळाली आणि निधीही उपलब्ध झाला, असा दावा त्यांनी केला.
‘छत्रपती संभाजीनगर-जालना EV मॅग्नेट झालं’ – मराठवाड्यातील औद्योगिक विकासाचाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केला. DMIC कोणी आणली, उद्योग कोणी आणले, असा सवाल करत त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे देशातील EV उद्योगाचं महत्त्वाचं केंद्र बनल्याचं सांगितलं. “तुम्ही केवळ विरोध करत राहा, बोलत राहा. आम्ही काम करत राहू,” अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनावर टीका केली. मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा दाखला देत त्यांनी ‘करून दाखवणं’ विरुद्ध ‘फक्त बोलणं’ असा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला.












Leave a Reply