बंडखोरीच्या चर्चांवर फडणवीस स्पष्ट; “उमेदवारी मिळाली नाही तर माघार घ्या, तरीही बंड केलं तर चर्चा करू”

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी अनुक्रमे डॉ. स्मिता जाधव, सुधाकर कोहळे आणि कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, काही इच्छुकांकडून बंडखोरीची शक्यता व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपने तीन जागांसाठी उमेदवार घोषित केले असून या तिन्ही जागा जिंकण्याचा पक्षाला विश्वास आहे. उर्वरित मतदारसंघांत महायुतीतील मित्रपक्ष निवडणूक लढवतील आणि तेही विजयी होतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

बंडखोरीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पक्षाने ज्याला उमेदवारी दिली आहे, त्यानेच निवडणूक लढवावी. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी माघार घ्यावी. तरीही कोणी बंडखोरी करणार असेल, तर त्यांच्याशी चर्चा करून मनधरणी केली जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *