मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य प्रवेशाबाबत गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या चर्चांना आता खुद्द फडणवीसांनीच स्पष्ट उत्तर दिलं आहे. सध्या महाराष्ट्र सोडून दिल्लीच्या राजकारणात जाण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पक्ष आणि नेतृत्वाने निर्णय घेतल्यास भविष्यात दिल्लीची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
एबीपी माझाच्या ‘माझा इन्फ्रा व्हिजन’ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दिल्लीवारीबाबतच्या चर्चांवर भाष्य केलं. “2029 पर्यंत माझे नेते मला महाराष्ट्रातच ठेवतील,” असं सांगत त्यांनी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीकडे जाण्याच्या शक्यतेला नकार दिला.
दिल्लीला जाण्याचा निर्णय स्वतःचा नसून पक्ष आणि वरिष्ठ नेतृत्वाचा असेल, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली. “माझा पक्ष ठरवेल, माझे नेते ठरवतील, त्या दिवशी मी नक्की दिल्लीला जाईन; मात्र आज माझं मत आहे की 2029 पर्यंत मी दिल्लीत नाही,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, दिल्लीच्या राजकारणात जाण्याच्या चर्चांवर फडणवीसांनी मिश्कील टिप्पणीही केली. दर काही महिन्यांनी आपल्याला दिल्लीला पाठवलं जातं, कधी बातमी नसल्यामुळे तर कधी नवी बातमी निर्माण करण्यासाठी, असं त्यांनी नमूद केलं.
महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य – याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचाही रोडमॅप मांडला. महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याच्या जवळ पोहोचला असून, हे लक्ष्य गाठण्याची क्षमता राज्याकडे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या सुमारे 660 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. राज्याचा सध्याचा विकासदर 8.8 टक्के असल्याचं सांगत फडणवीसांनी भविष्यात हा वेग आणखी वाढवण्याची गरज व्यक्त केली.
2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि मजबूत विकासदर आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. एकीकडे दिल्लीच्या राजकारणातील चर्चांना स्पष्ट उत्तर देताना “2029 पर्यंत महाराष्ट्रातच” अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली, तर दुसरीकडे महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेपर्यंत नेण्याचा विकासाचा संकल्पही त्यांनी अधोरेखित केला.















Leave a Reply