मुंबई महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांसाठी नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. जनतेच्या पैशांचा वापर केवळ विकासकामे आणि नागरिकांच्या सुविधांसाठीच झाला पाहिजे, अनावश्यक खर्चाला कोणतीही जागा नसल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी घेतल्याचे समजते. त्यांच्या निर्देशानंतर संबंधित प्रस्ताव मागे घेण्याच्या हालचालींना वेग आला असून, भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी मांडलेल्या प्रस्तावावरून सत्ताधाऱ्यांचीही कोंडी झाली आहे.
यापूर्वी महापालिकेने महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि विविध समिती अध्यक्षांसाठी 13 नवीन वाहने खरेदी केली होती. त्यामध्ये इनोव्हा हायक्रॉस आणि स्कॉर्पिओ-एन गाड्यांसाठी सुमारे 2.16 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर स्कॉर्पिओ-एन गाड्या प्रवासासाठी सोयीस्कर नसल्याची तक्रार करत नव्याने इनोव्हा खरेदीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विरोधक असोत किंवा सत्तेतले लोकप्रतिनिधी, जनतेच्या पैशांची उधळपट्टी कोणाकडूनही सहन केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका कायम ठेवली आहे. मुंबईकरांचा पैसा हा केवळ विकास आणि नागरिकांच्या हितासाठीच खर्च झाला पाहिजे, यावर त्यांनी पुन्हा एकदा भर दिल्याचे सूत्रांनी सांगितले.















Leave a Reply