महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राला अणुऊर्जेची नवी ताकद; 4200 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना चालना

मुंबई : महाराष्ट्राच्या वाढत्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी स्वच्छ आणि सक्षम ऊर्जा स्रोतांकडे राज्य सरकारचा भर वाढत आहे. याच दिशेने अणुऊर्जा निर्मितीला मोठी चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडसोबत अणुऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी दोन सामंजस्य करार करण्यात आले.

या करारांमुळे राज्याच्या अणुऊर्जा निर्मिती क्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून तब्बल 4200 मेगावॅट क्षमतेची उभारणी होणार असून, त्यासाठी सुमारे 79 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अणुऊर्जा हा भविष्यातील ऊर्जेचा सक्षम पर्याय असल्याचे सांगितले. राज्याची वाढती ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासोबतच स्वच्छ ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नव्या अणुऊर्जा प्रकल्पांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

11 हजार 700 रोजगारांच्या संधी – या प्रकल्पांमुळे केवळ ऊर्जा निर्मिती वाढणार नाही, तर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे. नव्या अणुऊर्जा प्रकल्पांमधून सुमारे 11 हजार 700 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, राज्यात यापूर्वीच विविध अणुऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून क्षमता वाढवण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू आहे. रत्नागिरीतील बारसू येथे 6000 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी प्रक्रिया सुरू असून, सिंधुदुर्गातील देवगड येथे एनटीपीसीकडून सहा युनिट्सच्या माध्यमातून 4000 ते 7200 मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. म्हणूनच, नव्या करारांसह कोकणातील प्रस्तावित प्रकल्प आणि इतर ऊर्जा उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या स्वच्छ ऊर्जा क्षमतेला आगामी काळात मोठी झेप मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *