नाशिक : आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक सोहळ्याला सुरुवात झाली आहे. नवीन गोदाघाटावर उभारण्यात आलेल्या धर्मध्वजस्तंभाचे विधिवत पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (31 ऑक्टोबर) संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणेश पूजनही करण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण पर्वानिमित्त आयोजित हा सोहळा वैदिक मंत्रोच्चार, शंखनाद आणि धार्मिक जयघोषात पार पडला. यावेळी साधुसंत, महंत, विविध आखाड्यांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धर्मध्वज पूजनानंतर शंखनाद करून ध्वजाची आरती करण्यात आली. त्यानंतर जगद्गुरू शंकराचार्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मध्वजाची प्रदक्षिणा केली. भगवान त्र्यंबकेश्वराची प्रार्थनाही करण्यात आली. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात धर्मध्वजारोहणाचा धार्मिक सोहळा पार पडला.
यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपस्थितांनी पवित्र गोदावरीची आरती केली. त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व असलेल्या या सोहळ्यामुळे आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्वाची तयारी अधोरेखित झाली.












Leave a Reply