ठाणे : भारताची लोकशाही आणि संविधानिक व्यवस्था कमकुवत करून देशात चीनच्या विचारसरणीला अनुकूल असलेली लाल व्यवस्था आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केला आहे. संविधानाच्या नावाखाली राजकीय भूमिका मांडणारे विरोधक दुसरीकडे घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता कमी करण्याचे काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली. चीनकडून काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या ट्रस्टला देणग्या का मिळतात, असा थेट सवाल उपस्थित करत फडणवीस यांनी राहुल गांधी यांनाही लक्ष्य केले.
ठाण्यात भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकतंत्र बचाव पदयात्रेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
देशातील घटनात्मक संस्थांविषयी जनतेच्या मनात अविश्वास निर्माण करायचा, त्यानंतर संविधान आणि लोकशाही सामान्य नागरिकांना न्याय देऊ शकत नाही, असा समज पसरवायचा आणि त्यातून देशाच्या व्यवस्थेत बदल घडवून आणायचा, अशी विरोधकांची रणनीती असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. विरोधकांकडून दाखवले जाणारे लाल संविधान हे केवळ एक प्रतीक असून, त्यामागील राजकीय हेतू वेगळे आहेत, असा दावाही त्यांनी केला.
चीनच्या देणग्यांवरून राहुल गांधींना सवाल – भारताच्या हिताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या चीनकडून काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या ट्रस्टला आर्थिक मदत का मिळते, असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित केला. चीनच्या पैशाच्या माध्यमातून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे का, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले. विरोधकांकडून संविधानाचा उल्लेख केला जात असताना त्याच वेळी घटनात्मक संस्थांना बदनाम करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमधील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत अशाच प्रकारच्या विचारसरणीचा प्रभाव भारतात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला. देशात अराजकता निर्माण करण्याच्या कथित प्रयत्नांविरोधात भाजप रस्त्यावर उतरला असून, ही लढाई कोणत्याही एका पक्षाची किंवा नेत्याची नसून भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘संविधानाची मोडतोड काँग्रेसनेच केली’ – संविधानाच्या संरक्षणाची भाषा करणाऱ्या काँग्रेसच्या इतिहासावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले. 1975 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवल्यानंतर काँग्रेस सरकारने घटनादुरुस्त्यांच्या माध्यमातून न्यायालयीन अधिकारांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर 1976 मध्ये करण्यात आलेल्या घटनादुरुस्त्यांचाही उल्लेख करत त्यांनी तत्कालीन सरकारच्या भूमिकेवर टीका केली. काँग्रेसनेच आपल्या राजकीय फायद्यासाठी संविधानात बदल केले आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर मर्यादा आणल्या, असा दावा फडणवीस यांनी केला. त्यामुळे आज संविधानाच्या रक्षणाचा दावा करणाऱ्या काँग्रेसने आधी आपल्या ऐतिहासिक भूमिकेचे उत्तर द्यावे, असे ते म्हणाले. ‘मतचोरी’चा आरोप करणाऱ्या काँग्रेसनेच प्रत्यक्षात संविधानाची मोडतोड केली, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतून (SIR) बांगलादेशी घुसखोरांची नावे वगळली जात असल्याने काँग्रेस आणि विरोधकांकडून विरोध केला जात असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. भारतीय संविधान, लोकशाही आणि देशाच्या सार्वभौम व्यवस्थेच्या संरक्षणासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन करत त्यांनी पदयात्रेतून विरोधकांच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला.












Leave a Reply