मुंबईतून एकही आंतरराष्ट्रीय उड्डाण नवी मुंबई विमानतळावर हलवू नका! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्राकडे ठाम मागणी

मुंबई : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकही आंतरराष्ट्रीय उड्डाण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवू नये, अशी मागणी त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे पत्राद्वारे केली आहे. परदेशी विमान कंपन्यांनी नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर करण्यास नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-1च्या पुनर्विकासादरम्यान विमानसेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्याचा पर्याय सुचवला आहे. सध्याचे टर्मिनल सुरू ठेवून आधी नवीन इमारतीची उभारणी करावी आणि त्यानंतर जुन्या टर्मिनलची पुनर्बांधणी करावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.प्रस्तावित आराखड्यानुसार, सर्वप्रथम टर्मिनल 1 बी उभारण्यात येणार आहे. त्यानंतर टर्मिनल 1 ए मधील विमानसेवा आणि अन्य कामकाज १बीमध्ये स्थलांतरित केले जाईल. पुढील टप्प्यात 1 ए पाडून त्या ठिकाणी नवीन टर्मिनल उभारण्यात येईल. या पद्धतीमुळे संपूर्ण टर्मिनल बंद न करता पुनर्विकासाचे काम करता येणार आहे. परिणामी, विमानसेवा अन्यत्र हलवण्याची किंवा उड्डाणे रद्द करण्याची वेळ येणार नाही.

1964 मध्ये सुरू झालेल्या टर्मिनल-1च्या इमारतीची संरचनात्मक स्थिती आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पुनर्विकासाची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवाशांची गैरसोय टाळण्याला प्राधान्य दिले आहे.

दरम्यान, पुनर्विकसित टर्मिनल-1ची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता दोन कोटी प्रवाशांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. प्रवासी प्रक्रिया, सुरक्षा तपासणी आणि इतर पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा केल्या जाणार आहेत. मार्च 2029 पर्यंत हे नवीन टर्मिनल कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *