बीडीडी चाळ पुनर्विकासाला वेग; 557 रहिवाशांना 500 चौ. फुटांच्या घरांच्या चाव्या, 2030 पर्यंत पुनर्वसन पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ना. म. जोशी मार्ग येथील 557 रहिवाशांना 500 चौरस फुटांच्या नव्या घरांचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत घरांच्या चाव्यांचे प्रातिनिधिक वितरण करण्यात आले. यावेळी बीडीडी चाळीतील सर्व रहिवाशांचे पुनर्वसन 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी म्हाडाला दिले.

अनेक वर्षे 160 चौरस फुटांच्या घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आता प्रशस्त आणि आधुनिक घरांचा लाभ मिळत आहे. वरळी आणि नायगावनंतर ना. म. जोशी मार्गावरील रहिवाशांचेही स्वप्न पूर्ण होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, मिळालेली घरे विकण्याऐवजी सोन्यासारखी जपून पुढील पिढ्यांकडे वारसा म्हणून सोपवा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

या पुनर्विकासातून एकूण 15 हजार 593 रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. आतापर्यंत 3 हजार 933 घरांचा ताबा देण्यात आला आहे. ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव प्रकल्प डिसेंबर 2029 पर्यंत, तर वरळी प्रकल्प जून 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, पुनर्विकासासाठी पात्र ठरलेल्या 2363 पोलिसांना 15 लाखांत घरे दिली जात आहेत. मात्र, 2011 नंतर पात्र ठरलेल्या 223 पोलिसांसाठी निश्चित केलेल्या घरांच्या किमतींबाबत पुनर्विचार करून तोडगा काढण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *