‘तेच आता तोंड उघडून बोलतायत’; शेतकरी मदतीवरून देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

पुणे : शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या आर्थिक मदतीवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मोठ्या-मोठ्या गाड्यांमध्ये फिरणाऱ्यांना आणि मोठ्या घरांमध्ये राहणाऱ्यांना पाच हजार रुपयांचं महत्त्व कळू शकत नाही. मात्र, या रकमेचं महत्त्व शेतकऱ्यांना चांगलं ठाऊक आहे,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावलं. यापूर्वीच्या सरकारांनी शेतकऱ्यांसाठी ठोस मदत करण्याऐवजी केवळ आश्वासनं दिली, असा टोलाही त्यांनी लगावला.

पुण्यात हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या आगाऊ आर्थिक मदतीवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आर्थिक मदत जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महायुती सरकारने शेतकऱ्यांना यापूर्वीच्या सरकारांच्या तुलनेत सर्वाधिक मदत केली आहे. विरोधकांकडून कितीही टीका झाली तरी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेपासून सरकार मागे हटणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

केंद्र सरकारही मदतीसाठी पुढे – राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. केंद्र सरकारकडून मिळणारी मदत आणि राज्य सरकारची आर्थिक मदत यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

पुणे मेट्रोसाठी एकाच तिकिटाची सुविधा – दरम्यान, पुणे मेट्रोच्या एकात्मिक तिकीट प्रणालीबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. मेट्रोची ‘इंटिग्रेटेड तिकीटिंग सिस्टीम’ सुरू झाली असून, ONDC च्या माध्यमातून पीएमपीएलचाही या व्यवस्थेत समावेश करण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक सुलभ आणि एकत्रित प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी या प्रणालीमध्ये आणखी तांत्रिक सुधारणा आणि एकत्रीकरणाची कामं लवकरच पूर्ण केली जातील, असं त्यांनी सांगितलं.

दिया मिर्झांच्या आवाहनावरही भाष्य – मुंबई महापालिकेच्या सोशल मीडिया हँडलवर अभिनेत्री आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्या दिया मिर्झा यांनी दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चेबाबत विचारले असता, मुंबई महापालिकेच्या सोशल मीडिया हँडलवर कोणती माहिती प्रसिद्ध करायची, हा त्यांचा अधिकार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दिया मिर्झा या प्रसिद्ध अभिनेत्री असल्या तरी त्या देशातील मोठ्या राजकीय नेत्या नाहीत. त्यामुळे या विषयाला विनाकारण अधिक महत्त्व देण्याची गरज नसल्याची टिप्पणीही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *