पुण्याच्या मेट्रोला विकासाची नवी झेप! 44.39 किमीचे जाळे विस्तारण्याची तयारी; पुरंदर विमानतळही जोडणार

पुणे : पुण्याच्या वेगाने वाढणाऱ्या शहरी विस्ताराला आता मेट्रोची भक्कम साथ मिळणार आहे. शहराच्या पूर्व, पश्चिम आणि नैऋत्य भागांना जोडण्यासाठी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल 44.39 किलोमीटरचे नेटवर्क उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या विस्तारात 41 स्थानकांचा समावेश असून, भविष्यात पुरंदर विमानतळापर्यंतही मेट्रो पोहोचवण्याची योजना आखली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्याच्या पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

पुणे मेट्रोच्या विस्तार आराखड्यानुसार चार प्रमुख मार्गिकांवर काम पुढे नेण्याचे नियोजन आहे. वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोलीतील विठ्ठलवाडी, खराडी ते खडकवासला आणि नळस्टॉप ते वारजेमार्गे माणिकबाग या मार्गांचा त्यात समावेश आहे. यामुळे आयटी पार्क, व्यापारी केंद्रे, निवासी परिसर आणि शहरातील महत्त्वाच्या वाहतूक केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे. या विस्तारातील खराडी-खडकवासला मार्ग विशेष महत्त्वाचा आहे. 25.52 किलोमीटरच्या या मार्गावर 22 उन्नत स्थानके प्रस्तावित आहेत. तर नळस्टॉप-वारजे-माणिकबाग ही 6.12 किलोमीटरची जोडमार्गिका असेल. या दोन्ही मार्गांसाठी अंदाजे 9857 कोटी 85 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. खराडी, मगरपट्टा, हडपसर, स्वारगेट, नांदेड सिटी आणि वारजे या भागांना याचा फायदा होणार आहे.

पुण्याच्या पश्चिम आणि पूर्व भागांनाही मेट्रोची नवी जोड मिळणार आहे. वनाज-चांदणी चौक हा 1.12 किलोमीटरचा मार्ग असून त्यावर दोन स्थानके असतील. तर रामवाडी-विठ्ठलवाडी हा 11.63 किलोमीटरचा विस्तार , 11 स्थानकांसह विकसित करण्याचे नियोजन आहे. दोन्ही मार्गांची एकत्रित लांबी 12.75 किलोमीटर आहे.

विमानतळ कनेक्टिव्हिटीवरही भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्याच्या भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन विमानतळ कनेक्टिव्हिटीचाही विचार करण्यात येत आहे. लोहगाव विमानतळापर्यंत सुमारे तीन किलोमीटरची मेट्रो जोडणी प्रस्तावित असून त्यासाठी मार्गनिश्चिती सुरू आहे. दुसरीकडे, प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी 30 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात पुणे शहर, औद्योगिक क्षेत्रे आणि विमानतळ यांच्यातील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी विस्तार – मेट्रोचे जाळे शहराच्या इतर भागांपर्यंत पोहोचवण्यासाठीही विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. पिंपरी-निगडी 4.41 किलोमीटर विस्तार जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. स्वारगेट-कात्रज 6.06 किलोमीटर मार्ग मार्च 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याशिवाय हडपसर-लोणी काळभोर, हडपसर-सासवड रोड, जिल्हा न्यायालय-पूलगेट-कोंढवा-येवलेवाडी आणि कोंढवा-उंड्री या मार्गांचाही विचार सुरू आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भक्ती शक्ती ते चाकण या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच या परिसरात 18 किलोमीटरच्या विद्युत जलद परिवहन प्रणालीचाही प्रस्ताव आहे. एकूणच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्याच्या मेट्रो नेटवर्कचा विस्तार केवळ शहराच्या मध्यवर्ती भागापुरता मर्यादित न ठेवता उपनगरांपासून विमानतळांपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि भविष्यातील शहरी गरजा लक्षात घेता हा विस्तार पुण्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *