नागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी ते नागपूर जिल्ह्यातील दोन गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला, 7 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री नरखेड तालुक्यातील लोहारीसावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम करणार आहेत. रात्री 9 ते 10 या वेळेत ते गावातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधतील. यावेळी शेती, सिंचन, पीक परिस्थिती आणि ग्रामीण भागातील समस्यांबाबत चर्चा होणार आहे.
8 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी सकाळी नरखेड तालुक्यातील लोकप्रतिनिधींशी बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री खारी प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. तसेच पांदण रस्ते आणि शेतांची प्रत्यक्ष पाहणी करतील. त्यानंतर कळमेश्वर तालुक्यातील कोहळी येथे जाऊन पिकांची पाहणी करणार आहेत.
दरम्यान, राज्यातील सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी किमान एक दिवस गावात जाऊन शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करावी आणि त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.












Leave a Reply