मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती; राज्यात वर्षभरात 10505 सायबर गुन्हे, 2379 आरोपींना अटक

मुंबई : राज्यात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण समोर आले असून 2025 ते मे 2026 या कालावधीत राज्यभरात तब्बल 10 हजार 505 सायबर गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत 2 हजार 379 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आमदार काशीनाथ दाते, अबू आझमी आणि विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही आकडेवारी जाहीर केली. नागपूरमध्ये जानेवारी ते मे 2026 दरम्यान ज्येष्ठ नागरिकांची सायबर माध्यमातून फसवणूक झाल्याचे 30 गुन्हे दाखल झाले आहेत. पुणे शहरात 536 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून सुमारे 2 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

मुंबईत 2025 मध्ये आर्थिक सायबर फसवणुकीचे 4 हजार 825 गुन्हे दाखल झाले असून 1 हजार 410 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्यातील विविध सायबर गुन्ह्यांमध्ये एकूण 1 हजार 31 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. मात्र, पोलिस आणि सायबर यंत्रणांच्या प्रभावी कारवाईमुळे 110 कोटी रुपयांची रक्कम होल्ड करण्यात यश आले आहे.

नागरिकांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक करण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच सायबर फसवणुकीची तक्रार नोंदविण्यासाठी राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टल आणि 1930 हेल्पलाइनची माहिती व्यापक स्तरावर पोहोचवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंक, संदेश किंवा आर्थिक व्यवहारांबाबत विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *