डान्सबारवरील पळवाटांना लगाम; फडणवीस सरकार आणणार कडक कायदा, वारंवार नियम मोडणाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द

मुंबई : राज्यातील डान्सबारच्या नावाखाली सुरू असलेल्या नियमभंगाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. मनोरंजनाच्या परवान्याचा गैरवापर करून डान्सबार चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी विद्यमान कायद्यात सुधारणा केली जाणार असून, वारंवार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

डान्सबारमुळे अनेक कुटुंबांवर गंभीर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यापूर्वी डान्सबार नियमन कायदा लागू केला होता. सर्वोच्च न्यायालयानेही या कायद्याला मान्यता दिल्यानंतर काही बारचालकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींचा आधार घेत ‘ऑर्केस्ट्रा बार’च्या नावाखाली व्यवसाय सुरू ठेवण्याचा मार्ग शोधल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे.

यामुळे आता अशा पळवाटा कायमच्या बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापुढे मनोरंजनाच्या नावाखाली परवाना घेऊन प्रत्यक्षात डान्सबार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच कोणत्याही बारला परवानगी देताना डान्सबार नियमन कायद्याच्याच चौकटीत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत अशा प्रकारची परवानगी देण्याचा मार्ग बंद केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ठाणे जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा बारच्या मुद्द्यावर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाण्यातील एकाही डान्सबारला डान्सबार नियमन कायद्यानुसार परवानगी देण्यात आलेली नसल्याचे सांगितले. मात्र, सार्वजनिक मनोरंजन नियमावलीचा आधार घेत काही बार सुरू असल्याचे सरकारच्या लक्षात आले असून, त्यावरही आता कायदेशीर निर्बंध आणले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *