“विद्यार्थ्यांना धमकी देणाऱ्या पोलिसावर तात्काळ कारवाई; चौकशी पूर्ण होईपर्यंत कठोर निर्णय”- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रग्जचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्य सरकारने तत्काळ दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची बदली करण्यात आल्याची माहिती देत, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले. चौकशी अहवाल आल्यानंतर आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचा उल्लेख केला. पेपरफुटी प्रकरणांवर फास्टट्रॅक न्यायालयांद्वारे जलद सुनावणीचा निर्णय घेण्यात आला असून, नीटची फेरपरीक्षाही सुरळीत पार पडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षणासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोठी वाढ झाल्यामुळे आयआयटी, एम्ससारख्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अधिक संधी उपलब्ध झाल्याचा दावा त्यांनी केला.

विरोधकांवर टीका करताना फडणवीस यांनी काँग्रेसशासित राज्यांतील पेपरफुटीच्या घटनांचा उल्लेख केला. महाराष्ट्रातील टीईटी घोटाळाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उघडकीस आल्याचे सांगत, आपल्या सरकारने परीक्षा होण्यापूर्वीच आरोपींवर कारवाई केल्याचा दावा त्यांनी केला. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या राजकीय दुराव्यामुळेच त्यांना “जंतर-मंतर” दिसत असल्याचा टोला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *