कर्तव्यापलीकडची माणुसकी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या दत्तक लेकीचा पुनर्विवाह थाटात

नागपूर : कोरोनाच्या संकटाने अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. अनेक महिलांनी पती गमावला, तर मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. मात्र, अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी पुढे आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातील माणुसकीचा एक भावनिक क्षण नागपुरात पाहायला मिळाला. त्यांच्या पालकत्वाखाली असलेल्या प्रीती आकडे यांचा पुनर्विवाह मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. माजी आमदार संदीप जोशी यांच्या ‘सोबत’ उपक्रमांतर्गत हा विवाहसोहळा पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वैवाहिक आयुष्यासाठी आशीर्वाद दिले.

कोरोना महामारीच्या काळात पती गमावलेल्या आणि कुटुंबाची जबाबदारी एकट्याने सांभाळणाऱ्या महिलांना आधार देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि संदीप जोशी यांनी मिळून २९३ कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले होते. त्यापैकी तब्बल १०० कुटुंबांची वैयक्तिक जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः स्वीकारली. या कुटुंबांतील मुलींच्या विवाहापर्यंत त्यांना आवश्यक ते पाठबळ देण्याचा संकल्पही फडणवीस यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे प्रीती आकडे यांचा झालेला पुनर्विवाह हा त्या संकल्पाच्या पूर्ततेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

पुनर्विवाहानंतर प्रीती आकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संदीप जोशी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “आज माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. माझे दोन्ही भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, याचा मला प्रचंड आनंद आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. कोविड काळात १९ ते २५ वयोगटातील अनेक तरुणींवर कुटुंबाची जबाबदारी आणि वैधव्याचे दुःख ओढावले होते. अशा सुमारे २९३ कुटुंबांसोबत उभे राहण्याचा निर्णय ‘सोबत’ उपक्रमातून घेण्यात आला. या उपक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सक्रिय साथ दिली.

नागपुरातील प्रीती आकडे यांच्या विवाहसोहळ्यात राजकीय टीकेपेक्षा पालकत्व, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश अधिक ठळकपणे समोर आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेल्या पालकत्वातून एका कुटुंबाच्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *