मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या संदेशातून महाराष्ट्राच्या विकासाचा व्यापक संकल्प मांडला. महाराष्ट्राची मागची आणि सध्याची पिढी दुष्काळाच्या झळा सोसत आली; मात्र पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांपर्यंत नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून पाणी पोहोचवून महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राची देशाच्या अर्थव्यवस्थेतील भूमिका अधोरेखित करताना, महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचे नमूद केले. राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूक होत असून, त्यातून तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्हा विकासाचे स्वतंत्र केंद्र बनला पाहिजे, ही सरकारची भूमिका असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर 8.8 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचा उल्लेख करत त्यांनी गडचिरोली, पालघर, नंदुरबारसारख्या भागांपर्यंत विकास पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.
शेतकरी कल्याणासाठी 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा लाभ देण्यासह 76 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षभरात 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्पही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.















Leave a Reply