मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील राजकीय भूमिकेबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या संसदीय मंडळात महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून फडणवीस यांचा समावेश होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. ही नियुक्ती झाल्यास फडणवीस यांच्यासह महाराष्ट्राचेही भाजपच्या राष्ट्रीय निर्णयप्रक्रियेत महत्त्व वाढण्याची शक्यता आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील बदलानंतर आता संसदीय मंडळातही फेरबदल होण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी नितीन गडकरी हे या मंडळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या बाहेर पडल्यानंतर राज्याला या सर्वोच्च समितीत प्रतिनिधित्व मिळालेले नाही.
फडणवीस यांनी महाराष्ट्रात भाजपला सलग निवडणुकांमध्ये भक्कम यश मिळवून दिले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर त्यांचे राजकीय महत्त्व वाढल्याचे मानले जाते. त्यांच्या संभाव्य नियुक्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना यामुळे पुन्हा बळ मिळाले असले, तरी त्यांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याची भूमिका यापूर्वी स्पष्ट केली आहे.















Leave a Reply