मुंबई : महाराष्ट्रातील शहरी वाहतूक व्यवस्थेला अधिक वेगवान आणि आधुनिक बनवण्यासाठी राज्य सरकारने मेट्रो विस्ताराचा महत्त्वाकांक्षी आराखडा आखला आहे. 2038 पर्यंत राज्यात 300 किलोमीटरहून अधिक नवीन मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, प्रत्येक नवीन प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तीन वर्षांच्या आत पूर्ण व्हावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्यातील विविध मेट्रो प्रकल्पांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई, पुणे, नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या नागरीकरणाचा विचार करून सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ करण्यावर भर दिला. यामुळे भविष्यातील शहरी विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मीरा गाव ते गायमुख या मेट्रो-10 मार्गाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. सुमारे 9.68 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर पाच उन्नत स्थानके उभारली जाणार आहेत.याशिवाय मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि नागपूरमध्ये मेट्रोच्या विविध नवीन मार्गांना मंजुरी देत विस्ताराचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई मेट्रो-8, मेट्रो-11, मेट्रो-13, मेट्रो-14, पुणे मेट्रो फेज-3 तसेच नवी मुंबई आणि नागपूरमधील विस्तार प्रकल्पांचा यात समावेश आहे.
राज्यात सध्या सुमारे ₹2.80 लाख कोटींच्या मेट्रो प्रकल्पांवर काम सुरू असून, केंद्र सरकार, राज्य सरकार, एमएमआरडीए आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने या प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील मेट्रो नेटवर्क अधिक व्यापक आणि गतिमान करण्यासाठी सरकारने वेगवान अंमलबजावणीवर विशेष भर दिला आहे.















Leave a Reply