राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; ‘जातीय जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश’

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ११व्या राष्ट्रीय अधिवेशनाला बंगळुरूमध्ये सुरुवात होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाशी संबंधित महत्त्वपूर्ण घोषणा केली. जातीय जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्यात येईल, तसेच अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या ठरावांची राज्य सरकारकडून अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

देशभरातून आलेल्या प्रतिनिधी, महिला, युवा कार्यकर्ते आणि महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे अधिवेशन केवळ चर्चेचे व्यासपीठ नसून सामाजिक न्याय, समरसता आणि राष्ट्रनिर्मितीला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री फडणवीस यांनी महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शोषित, वंचित आणि मागास समाजाला आत्मसन्मान, समान संधी आणि अधिकार मिळवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी आयुष्य समर्पित केले. “शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग असून सामाजिक न्यायाचा तोच भक्कम पाया आहे,” असे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत महिलांसह वंचित समाजासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समान संधी आणि सामाजिक न्यायाची मजबूत चौकट उभी केली, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ओबीसी समाज हा भारताच्या विकासाचा सशक्त आधार असून त्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक न्यायाच्या दिशेने राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *