गडचिरोली आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द; मुख्यमंत्री फडणवीसांचे कठोर आदेश

मुंबई : गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच आश्रमशाळेची तपासणी करून अहवाल देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यालाही निलंबित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

9 ऑगस्टच्या रात्री आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी बैठकीत घटनेची माहिती दिली.

शासकीय अनुदान घेत असतानाही आश्रमशाळेत आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शिक्षक आणि वॉर्डनचा अभाव तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे झालेले दुर्लक्ष गंभीर असल्याचे स्पष्ट करत, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *