मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील विमान प्रवासाच्या संदर्भावरून राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. परभणीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी विमानातील भेटीचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस “हतबल” दिसत असल्याचा दावा केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हलक्याफुलक्या शैलीत पण ठाम शब्दांत उत्तर देत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलताना, “विमानात देवेंद्र फडणवीस भेटले तेव्हा ते अत्यंत हतबल दिसत होते. त्यांच्या वरिष्ठांकडूनच त्यांचे पंख छाटले जात असल्याची जाणीव त्यांना झाली होती,” असा दावा केला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझे पंखच नाहीत, मग ते छाटणार कोण? माझ्या पाठीशी महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा आशीर्वाद आहे.” त्यांनी या विषयाकडे फारसे गांभीर्याने पाहण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, त्या विमानप्रवासात उद्धव ठाकरे आणि ते वेगवेगळ्या जागांवर बसले होते. “आम्ही शेजारी बसलो असतो तर नक्कीच संवाद झाला असता. मात्र मी विमानात बसल्यानंतर मोबाईलवर आधीच डाउनलोड केलेली वेबसिरीज पाहत असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विशेष संवाद झाला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर देत राजकीय आरोप-प्रत्यारोपांवरही भाष्य केले. “राजकीय प्रश्नांपेक्षा राज्याचा विकास महत्त्वाचा आहे. विकासातूनच जनतेचे प्रश्न सुटतील. सर्व्हिस फ्लाइटमध्ये योगायोगाने दोन नेते एकत्र प्रवास करत असतील, तर त्यावर एवढा गाजावाजा करण्याचे कारण नाही,” असे सांगत त्यांनी सुरू असलेल्या चर्चांवर मिश्किल शब्दांत टीका केली.













Leave a Reply