दिल्ली दौऱ्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पूर्णविराम; “मी महाराष्ट्रातच आहे” म्हणत अफवांना उत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या चर्चांना उधाण आले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळणार, तसेच महाराष्ट्रात नेतृत्वबदल होणार, अशा विविध राजकीय चर्चा रंगल्या. विशेष म्हणजे पंढरपूरच्या दौऱ्यानंतर ते थेट दिल्लीला रवाना झाल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले.

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व तर्कवितर्कांवर एका वाक्यात पडदा टाकला. दिल्ली दौऱ्याबाबत विचारले असता त्यांनी मिश्किल शैलीत, “मी मुंबईतच आहे… मी महाराष्ट्रातच आहे,” असे सांगत कोणत्याही राजकीय बदलाच्या शक्यता फेटाळल्याचे चित्र दिसले.

यावेळी फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर झालेल्या राजकीय प्रतिक्रिया आणि सेलिब्रेशनवरही भाष्य केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न कोणत्याही पक्षापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा व्यवस्थेला अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी आवश्यक पावले उचलल्याचेही त्यांनी नमूद केले.

उद्धव ठाकरे यांच्या भाजपविरोधी भूमिकेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारची वक्तव्ये यापूर्वीही अनेकदा झाली आहेत. मात्र, देशातील जनतेचा विश्वास आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर कायम असल्याचा दावा त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *