पुणे : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना गुरुवारी पुण्यात प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. स्वारगेट येथील महाराष्ट्र मंडळाच्या मैदानावर झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून अजित डोवाल यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव करत त्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “एका धुरंधराचा सन्मान करण्यासाठी दुसरे धुरंधर पुण्यात आले आहेत.” राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात अजित डोवाल यांना ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाते, तर राजकारणातील रणनीतीसाठी अमित शाह यांची ओळख आहे. त्यामुळे या दोन्ही दिग्गजांची उपस्थिती हा “दुग्धशर्करा योग” असल्याचेही त्यांनी नमूद केले.
फडणवीस यांनी सांगितले की, २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून विश्वास टाकल्यानंतर भारताच्या सुरक्षा धोरणात मोठा बदल झाला. राष्ट्रीय सुरक्षेची नवी रणनीती आणि कूटनीती विकसित करण्यात डोवाल यांनी मोलाची भूमिका बजावली. आज भारत केवळ हल्ले सहन करणारा देश राहिलेला नसून, आवश्यकतेनुसार ठोस प्रत्युत्तर देणारे सक्षम राष्ट्र बनले आहे. या बदलामागे अजित डोवाल यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.यावेळी फडणवीस यांनी अजित डोवाल यांचे प्रसिद्ध विधानही उद्धृत केले. “राष्ट्रीय सुरक्षेमध्ये रौप्यपदक नसते. जिंकलात तर इतिहास घडवता आणि हरलात तर इतिहास बनता,” या विचारातून त्यांच्या कार्यपद्धतीची झलक दिसून येते, असे ते म्हणाले. देशाच्या सुरक्षेसाठी अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या आणि कधीही पुरस्कारांची अपेक्षा न ठेवता राष्ट्रसेवा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला हा सन्मान मिळणे ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित डोवाल यांचे अभिनंदन केले.















Leave a Reply