तिबेटमध्ये अडकलेल्या 37 भाविकांसाठी देवाभाऊंची तातडीची धाव; काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या मार्गावर सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील 37 भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर या सर्व भाविकांचा काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू झाला आहे.

ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे भाविक जय गिरनारी ट्रस्ट, अलिबागचे प्रमोद केणे यांच्यासोबत कैलास मानसरोवर यात्रेला गेले होते. यात्रा पूर्ण केल्यानंतर परतीच्या प्रवासात ते तिबेटमधील सागा येथे अडकले. काठमांडूहून 29 ऑगस्टला दुपारी दोन वाजता त्यांचे विमान असल्याने वेळेत तेथे पोहोचणे आवश्यक होते.

भाविक अडकल्याची माहिती नितीन शिर्के आणि राकेश जितेकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली. परिस्थितीची माहिती मिळताच देवाभाऊंनी तातडीने प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या. यानंतर महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी समन्वय साधत भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली. केंद्राकडूनही तत्परतेने मदत आणि सहकार्य मिळाले.

या समन्वित प्रयत्नांनंतर 28 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता 37 भाविक सागाहून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना झाले. त्यामुळे त्यांच्या नियोजित परतीच्या प्रवासाचा मार्गही मोकळा झाला आहे.

संकटाच्या प्रसंगी तातडीने मदत मिळाल्याबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार मानले. परदेशात अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी देवाभाऊंची तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *