मुंबई : भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यात झालेल्या व्यापक आर्थिक आणि व्यापार करारामुळे महाराष्ट्राच्या उद्योग, कृषी आणि निर्यात क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हा करार राज्यातील उद्योगांना जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षमपणे प्रवेश मिळवून देईल आणि विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ‘ग्लोबल ग्रोथ इंजिन’ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारत-यूके व्यापक आर्थिक व व्यापार कराराच्या अंमलबजावणी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, उदारीकरणापासून ‘मेक इन इंडिया’पर्यंत भारताने आर्थिक क्षेत्रात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले असून, हा व्यापार करार त्या प्रवासातील आणखी एक ऐतिहासिक पाऊल आहे. या करारामुळे भारताच्या बहुतांश निर्यातीला ब्रिटनमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळणार असून सेवा, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नवोन्मेष क्षेत्रातही मोठ्या संधी निर्माण होतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील उत्पादन उद्योगांना या कराराचा मोठा फायदा होणार आहे. वाहन उद्योग, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, रसायने, माहिती तंत्रज्ञान, फिनटेक आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी ब्रिटनची बाजारपेठ अधिक खुली होणार आहे. त्याचबरोबर नाशिकची द्राक्षे, कोकणचा हापूस, डाळिंब, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि सागरी उत्पादनांना उच्च मूल्याच्या जागतिक बाजारपेठेत अधिक संधी उपलब्ध होतील.
प्रत्येक शुल्क कपात ही एमएसएमई, शेतकरी, अभियंते आणि तरुण उद्योजकांसाठी जागतिक स्तरावर संधी निर्माण करणारी ठरेल, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योगांनी आता स्थानिक नव्हे तर जागतिक बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र शासन उद्योग, निर्यातदार आणि एमएसएमईंना जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करणार आहे. निर्यात सुलभीकरण, जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा आणि उद्योगपूरक वातावरण निर्माण करून या व्यापार करारातून निर्माण झालेल्या संधींचे रूपांतर गुंतवणूक, रोजगार, निर्यात आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक समृद्धीत करण्यासाठी राज्य कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.











Leave a Reply