“सर, तुमचं नाव काय?” मुख्यमंत्र्यांसमोर उभं राहून असा प्रश्न विचारण्याचं धाडस किती जणांमध्ये असेल? पण रायगड जिल्ह्यातील वहाळ गावातील चौथीत शिकणाऱ्या यशश्री मिठू घुलेने हे करून दाखवलं आणि काही क्षणांतच संपूर्ण वर्गाचं लक्ष तिच्याकडे खिळलं.
प्रवेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पीएम श्री शाळा, वहाळ येथे आले होते. डिजिटल लॅबचं उद्घाटन, विद्यार्थ्यांशी संवाद आणि विविध उपक्रमांमुळे शाळेत उत्साहाचं वातावरण होतं. मात्र, या कार्यक्रमातील सर्वात संस्मरणीय क्षण ठरला एका चिमुरडीची निरागस मुलाखत.
हातात प्रश्नांची यादी, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि मनात कुतूहल घेऊन यशश्री थेट मुख्यमंत्र्यांसमोर उभी राहिली. कोणतीही भीती न बाळगता तिने एकामागून एक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
“तुमच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली?”, “आव्हानांवर मात कशी केली?”, “प्रेरणा कुठून मिळते?” अशा प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अत्यंत संयमाने आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत उत्तरे दिली.
विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेला प्रवास, समाजासाठी काम करण्याची प्रेरणा, संघर्षातून मिळालेलं बळ आणि लोकांचा विश्वास हीच खरी ताकद असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विद्यार्थ्यांना मोठी स्वप्नं पाहण्याचा, वाचनाची सवय लावण्याचा आणि मेहनत-शिस्त अंगीकारण्याचा संदेशही दिला.
मात्र, संवादाचा सर्वात सुंदर क्षण अजून बाकी होता.जेव्हा यशश्रीने विचारलं, “तुमच्या आयुष्यातील असा कोणता अनुभव आहे, जो तुम्ही कधी विसरणार नाही?” त्यावर मुख्यमंत्री हसत म्हणाले, “आज वहाळ शाळेत तुझ्यासारख्या चिमुरडीने घेतलेली ही मुलाखत मी नक्की लक्षात ठेवेन. हे उत्तर ऐकताच वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. यशश्रीच्या चेहऱ्यावर आनंद खुलला आणि उपस्थितांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकला. हा संवाद केवळ प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम नव्हता. तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असलेल्या आत्मविश्वासाचा, शिक्षकांच्या अथक परिश्रमांचा आणि विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधणाऱ्या नेतृत्वाचा प्रेरणादायी अनुभव होता. वहाळच्या छोट्याशा वर्गात घडलेला हा प्रसंग एक मोठा संदेश देऊन गेला. योग्य संधी मिळाली तर गावातील प्रत्येक यशश्री मोठी स्वप्नं पाहू शकते आणि संवेदनशील नेतृत्व त्या स्वप्नांना नवी उभारी देऊ शकतं.













Leave a Reply