महाराष्ट्राच्या विकासाचा वेग कायम ठेवतानाच राज्यासमोरील दुष्काळाचे संकट मुळापासून दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीर्घकालीन जलव्यवस्थापनावर भर दिला आहे. महाराष्ट्राच्या मागील पिढ्यांनी दुष्काळाचा सामना केला; मात्र भविष्यातील पिढ्यांना ही परिस्थिती पाहावी लागू नये, यासाठी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळी भागांना पाणी देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप स्पष्ट केला. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील पाणीटंचाईग्रस्त भागांपर्यंत पाणी पोहोचवून महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने विस्तारत असून राज्याचा आर्थिक विकासदर जवळपास 8.8 टक्के राहिला आहे. प्रत्येक जिल्ह्याला विकासाचे केंद्र बनविण्यावर सरकारचा भर आहे. सुमारे 13 जिल्ह्यांनी निर्धारित विकासाचे लक्ष्य पूर्ण केले आहे.
महाराष्ट्राला ‘स्टार्टअप कॅपिटल’ बनविण्यासोबतच परकीय गुंतवणूक वाढविणे आणि युवकांसाठी रोजगारनिर्मितीवरही सरकारचा भर आहे. ‘एज्युसिटी’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे शिक्षण राज्यात उपलब्ध करून देण्याची तयारीही सुरू आहे.















Leave a Reply