केंद्रीय निधीच्या विनियोगाला वेग देण्याचे फडणवीसांचे निर्देश; 95% पेक्षा अधिक खर्चाचे लक्ष्य

मुंबई : केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या विविध योजनांच्या निधीचा पूर्ण क्षमतेने वापर करून विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागप्रमुखांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय योजनांच्या निधीचा विनियोग यंदा 95 टक्क्यांहून अधिक ठेवण्याचे उद्दिष्ट त्यांनी निश्चित केले आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय योजनांच्या निधीची उपलब्धता आणि आतापर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. पुढील वर्षात राज्याकडे सुमारे 16 ते 17 हजार कोटी रुपयांचा केंद्रीय निधी खर्च करण्याची क्षमता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या निधीचा मोठा भाग भांडवली स्वरूपाचा असल्याने त्याचा वेळेत वापर झाल्यास विकास प्रकल्पांना मोठी चालना मिळू शकते.

निधी उपलब्ध असूनही केवळ प्रशासकीय किंवा लेखा प्रक्रियेतील अडचणींमुळे खर्च रखडू नये, यासाठी संबंधित अडथळे तातडीने दूर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. निर्धारित कालावधीत निधीचा विनियोग करण्याची जबाबदारी संबंधित विभागांनी स्वीकारावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, निधी खर्चाच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या स्तरावर प्रभावी यंत्रणा उभारून दर तीन महिन्यांनी आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *