मुंबई : मुंबईच्या पुनर्विकासाला वेग देत पुढील दशकात शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. पुढील दहा वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे लक्ष्य असून, धारावी, म्हाडा वसाहती आणि BEST आगारांच्या पुनर्विकासाला यामध्ये महत्त्व दिले जाणार आहे.
मुंबईच्या विकासासाठी क्लस्टर पद्धतीचा अवलंब केला जात असून, पुनर्विकासाच्या माध्यमातून उपलब्ध जमिनीचा अधिक परिणामकारक वापर करण्यावर सरकारचा भर आहे. धारावी पुनर्विकासाला सुरुवात झाली असून, जानेवारी 2029 पर्यंत 10 हजार पुनर्वसन सदनिका तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईतील जुन्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचाही मुद्दा सरकारच्या प्राधान्यक्रमात आहे. अनेक वसाहतींना 50 वर्षांहून अधिक काळ झाल्याने त्यांचा नियोजित पद्धतीने विकास करून मुंबईच्या शहरी रचनेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
BEST आगारांनाही मिळणार आधुनिक स्वरूप – मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणाऱ्या BEST आगारांचा केवळ बस डेपो म्हणून विकास न करता मिश्र-वापराच्या पद्धतीने पुनर्विकास करण्याचे नियोजन आहे. आधुनिक बस स्थानके आणि प्रवासी सुविधांसोबतच निवासी व व्यावसायिक प्रकल्प, क्रीडांगणे, संग्रहालये आणि मनोरंजनाच्या सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामुळे BESTला उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळण्याची अपेक्षा आहे.
MMRच्या अर्थव्यवस्थेला 2047 पर्यंत नवी उंची – मुंबईच्या विकासाचा आवाका आर्थिक क्षेत्रापर्यंतही वाढवण्यात आला आहे. 2047 पर्यंत मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 1.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य विकास आराखड्यात ठेवण्यात आले आहे. MMRमध्ये डेटा सेंटर, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, फ्रंटियर टेक्नॉलॉजी आणि डीप टेकसारख्या क्षेत्रांना चालना देण्याची सरकारची भूमिका आहे.
दरम्यान, देशाचा पहिल्या तिमाहीतील विकासदर 7.8 टक्के असताना महाराष्ट्राने 8.8 टक्के विकासदर नोंदवल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. या आर्थिक प्रगतीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.
धारावीचा पुनर्विकास, जुन्या वसाहतींचे पुनरुज्जीवन, BESTचा कायापालट आणि आधुनिक उद्योगांना चालना या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महामुंबईला पुढील पिढीच्या शहरी विकासासाठी तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.















Leave a Reply