“महिलांवरची ही टीका नव्हे, राजकारणाचा घसरलेला स्तर”; ‘गुंगी गुडिया’ वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या उल्लेखावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या वादात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. अशा प्रकारची वैयक्तिक टीका ही केवळ राजकीय मतभेदांची अभिव्यक्ती नसून, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विरोधकांकडे जनतेसमोर मांडण्यासारखे ठोस मुद्दे नसल्यामुळे चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारची दर्जाहीन वक्तव्ये केली जात आहेत. “काँग्रेसला आज कुणी विचारत नाही आणि प्रतिसादही मिळत नाही. त्यामुळे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या टिप्पणी केल्या जात आहेत. ‘बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ’ या मानसिकतेतून हे राजकारण सुरू आहे,” अशी टीका त्यांनी केली.

फडणवीसांनी पुढे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचाही उल्लेख केला. वैचारिक विरोध असू शकतो, परंतु एखाद्या महिला नेत्याविषयी अशा पातळीवर जाऊन भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. “महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या खालच्या स्तरावर जाऊन टीका होताना यापूर्वी क्वचितच पाहायला मिळाली असेल,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या भूमिकेचे समर्थन करत, सुनेत्रा पवार यांनी ही टीका सकारात्मकपणे स्वीकारावी आणि आपण ‘गुंगी गुडिया’ नसून ‘दुर्गा’ असल्याचे सिद्ध करण्यासाठी अर्थ खात्याची जबाबदारी स्वतःकडे घ्यावी, असा सल्ला दिला. या विधानानंतर महायुती आणि काँग्रेस यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र झाला असून, या वादाचे राजकीय पडसाद पुढील काही दिवस उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *