मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका; “संवादातूनच तोडगा शक्य”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वातावरण तापू लागले असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. सरकारवर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावत त्यांनी मराठा समाजासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार केला, तसेच कोणालाही अन्याय झाल्याची भावना असल्यास संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याची तयारीही दर्शवली.

नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाच्या हितासाठी त्यांच्या सरकारने केवळ घोषणा केल्या नाहीत, तर अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची प्रभावी अंमलबजावणीही केली आहे. यापूर्वी कोणत्याही सरकारने इतक्या व्यापक स्तरावर काम केले नसल्याचा दावा त्यांनी केला. जात प्रमाणपत्रांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर अर्ज निकाली काढण्यात आले असून, प्रलंबित प्रकरणांची संख्या अत्यंत कमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप करत ५८ लाख कुणबी नोंदी, हैदराबाद गॅझेटिअर आणि आरक्षण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संघर्षाऐवजी संवादाला प्राधान्य देण्याचा संदेश दिला. “समाजातील कोणत्याही घटकाला न्याय मिळत नसल्याची भावना असेल, तर चर्चा आणि संवादातून त्यावर मार्ग काढता येतो,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नागपुरातील ढगफुटीसदृश पावसावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. अतिवृष्टीमुळे काही भागांत पाणी साचून नागरिकांना मोठा त्रास झाला असला, तरी प्रशासनाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शहरी ड्रेनेज व्यवस्थेचे नव्याने नियोजन करण्याची गरज निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. शाळांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याची माहिती देत प्रशासनाने तातडीने मदतकार्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *